Ad will apear here
Next
मराठी भाषा : काल, आज आणि उद्या...


एक मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. राज्यकारभाराची भाषा मराठी राहील असे धोरण त्याच दिवशी जाहीर करण्यात आले. त्यामुळे एक मे रोजी राजभाषा मराठी दिनही असतो. त्या निमित्ताने, मराठीच्या अध्यापिका पूजा संजय कात्रे यांनी मराठी भाषेबद्दल लिहिलेला हा लेख...  
..........
जैसी दीपांमाझि दिवटी । 
का तिथी माझि पूर्णिमा गोमटी । 
तैसी भाषांमध्ये मऱ्हाटी । सर्वोत्तम ।। 
तीर्थांमध्ये काशी । व्रतांमध्ये एकादशी । 
भाषांमध्ये तैशी । मऱ्हाटी शोभिवंत ।। 

असा मराठीबद्दल सार्थ अभिमान व्यक्त करणाऱ्या ज्ञानेश्वरांपासून मराठीची काव्यपरंपरा सांगितली जाते. मराठी भाषेला ज्ञानेश्वरांनी साहित्याच्या शिखरात हिमालयाची उंची मिळवून दिली. उत्तुंग प्रतिभा असणाऱ्या ज्ञानयोग्याने गीतेतील विचार मराठीत मांडून ज्ञानभांडार सर्वांना खुले करून दिले. मराठीचा हा मानाचा तुरा सुमारे सातशे वर्षे सर्वत्र अभिमानाने डोलतोय. पुढील अनेक वर्षे या रत्नाचे तेज लवमात्र कमी होणार नाही.



संत ज्ञानेश्वरांनंतर होऊन गेलेल्या संत एकनाथांच्या काळात संस्कृत भाषेचा वृथा अभिमान धरून पंडित कवी प्राकृत मराठी भाषेस कमी लेखात होते. त्यांना परखड सवाल करताना संत एकनाथ महाराज लिहितात -

संस्कृतवाणी देवे केली ।
तरी प्राकृत काय चोरापासोनी झाली ।।

मराठी भाषेचा अभिमान असा निर्भीडपणे व्यक्त करणाऱ्या एकनाथांनी मराठीत विपुल रचना केली.

आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने ।
शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं ।।

असे म्हणत शब्दांवर प्रभुत्व राखत संत तुकारामांनी तत्कालीन समाजाचं प्रबोधन केलं, अध्यात्म मार्ग विशद केला, चिवट जातिभेदाच्या भिंतींवर कठोर प्रहार केले, अभंगगाथा लिहिली, की जी आमच्या मराठी संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. 

वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा,
येरांनी वाहाचा भार व्यर्थ ।

असे परखड विधान कोणत्याही तथाकथित शाळेत अथवा मराठीच्या कोणत्याही ‘व्हेकेशन बॅच’ला न गेलेले तुकोबाराय अभिमानाने करतात.



मराठी भाषेचा जीवनप्रवाह अनेक वीरांनी, ज्ञानवंतांनी, सत्पुरुषांनी सुविचारांचे खतपाणी घालून सशक्त केला. दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक असं सरस लेखन करणारे रामदासांसारखे खंदे मार्गदर्शक, केकावली लिहून मराठी भाषेला शुद्ध आणि रेखीव स्वरूप प्राप्त करून देणारे मोरोपंत, टिळकांसारखे राजकारणी धुरंधर, सावरकरांसारखा योद्धा क्रांतिकारक, अतुलनीय पराक्रम गाजवणाऱ्यांचे मुक्त कंठाने गुणगान करणारे शाहीर, माधवराव पेशव्यांसारखे पराक्रमी, धुरंधर राजे, बालगंधर्वांसारखे गानसम्राट, कलेच्या क्षेत्रात नादब्रह्मात तत्कालीन झालेली पदन्यास करणारी चरणकमले, त्याचप्रमाणे
 
परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी । 
माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका ।। 
भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे । 
गुलाम भाषिक होऊनि अपुलया प्रगतीचे शिर कापू नका ।।

अशी मराठीची झालेली दैन्यावस्था आपल्या कवितेतून मांडणारे मराठी भाषेचे अनभिषिक्त राजपुरुष कुसुमाग्रज, केशवसुत, बा. भ. बोरकर, गोविंदाग्रज, कवी बी, अनिल, माधव जूलियन, दि. पु. चित्रे, दया पवार, नारायण सुर्वे, तसेच मराठी स्त्रियांमध्येही पुरुषांपेक्षा कांकणभर सरस कार्य करणाऱ्या.... भंग न पावणारे अभंग रचणाऱ्या, ‘आधी हाताला चटके, तवा मिळते भाकर ‘हे जीवनाचं तत्त्वज्ञान लीलया मांडणाऱ्या रूढार्थाने अशिक्षित, पण आयुष्याच्या शाळेत शिकलेल्या बहिणाबाई चौधरी!!! अशी अनेक नररत्ने महाराष्ट्राने आणि मायमराठीने अजरामर केलेली आहेत. 

मराठी भाषेचा वैभवसंपन्न इतिहास आणि तिची समृद्धी पाहिली, की फादर ख्रिस्तदास थॉमस स्टीफन्स यांनी मराठी भाषेबद्दल काढलेल्या

जैसी पुस्पांमाजि पुस्प मोगरी।
किं परिमळांमाजि कस्तुरि।
तैसी भासांमाजि साजिरी।
मराठिया।।

या उद्गारांची आठवण होते. 

... पण ही समृद्धी आणि भाषिक अस्मिता आज २१ व्या शतकात. राहिली आहे का, असा प्रश्न पडतो. मराठी भाषेचा पूर्वेतिहास अभिमान वाटावा इतका रोचक, संपन्न आणि वैभवपूर्ण आहे. आज मात्र मराठी भाषा महाराष्ट्रात लोप पावेल की काय, अशी अवस्था निर्माण झाली आहे. मराठीची ही दयनीय अवस्था -

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी 
आपुल्या घरांत हाल सोसते मराठी 

या कवी सुरेश भटांच्या कवितेतून गडद झालेली दिसते. मराठी बोलणाऱ्यांची संख्या लक्षात घेता मराठी ही जगातली पहिल्या १० क्रमांकामधली भाषा आहे. उच्च स्थानावर असूनही आपण विशेषत: इंग्रजीशी मराठीची तुलना करत असल्यामुळे आपलं मनच मराठी बोलताना आपल्याला कमी लेखतं. माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी याला ‘मनाची गुलामी’ असं नाव देतात. ही ‘मनाची गुलामी’ त्यांच्याच शब्दांत सांगायची झाल्यास, Any bullshit spoken in english sounds profound and anything profound spoken in marathi sounds bullshit अशी स्पष्ट करता येईल. म्हणजेच काय तर......इंग्रजीमध्ये केलेली बकवाससुद्धा लोकांना विद्वत्तापूर्ण भाषण वाटते आणि मराठीमध्ये केलेले विद्वत्तापूर्ण विवेचनसुद्धा अनेकांना बकवास वाटते. 



पंडित काव्याच्या काळात मराठी-संस्कृतचा संघर्ष होता; पण तो आजी-नातीचा कौटुंबिक व प्रेमाचा संघर्ष होता. परंतु मराठीवरील वर्तमान आक्रमण हे पूर्णपणे परकीय शत्रूचे आहे. आपलेच लोक इंग्रजीच्या प्रभावाने भारावून गेलेत. अशा परिस्थितीतही मराठी साहित्यिकांची मायबोलीच्या सामर्थ्यावरील अढळ निष्ठा व दृढ विश्वास, तिच्याबद्दलचा सार्थ अभिमान कणभरसुद्धा कमी झाला नाही. 

मराठी संस्कृतीच महाराष्ट्राच्या घरांघरातून लुप्त होण्याच्या मार्गावर आहे, तिथे संस्कृतीचा प्रमुख घटक असणाऱ्या भाषेबद्दल विशेष काय अनुभवास येणार? जीवनाच्या सर्व क्षेत्रात पाश्चात्य संस्कृतीने मुंगीच्या पावलाने, आता तर संगणकाच्या गतीने प्रवेश केलाय. जणू तिच्यामुळेच जगातील ज्ञानाची कवाडं उघडणार आहेत आणि मोक्षाची द्वारं खुली होणार आहेत. बालवाडीपासूनच बालकांना इंग्रजी अत्यावश्यक केले आहे. का? तर संगणकेश्वराला, नवनवीन इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाला या पिढीला तोंड देता यायला हवं. या वृत्तीचे पडसाद विद्यालये, महाविद्यालये यांवर उमटणेही साहजिकच आहे. 

गणित-विज्ञान या विषयांतील आकडे, संज्ञा, संकल्पना या इंग्रजीतूनच, दूरदर्शनवरील जाहिरातीत इंग्रजी शब्दांचा भरणा, देशी खेळांपेक्षा विदेशी खेळ जास्त लोकप्रिय, पोशाख, आचार-विचार इत्यादींमध्ये मराठी संस्कृती दूर जाऊन ब्रिटिशांचे अंधानुकरण. दूरदर्शन, मोबाइल ही करमणुकीची प्रभावी साधने झाल्यामुळे मुलांची वाचनाची आवड कमी. भाषा शिकणे व सुसंस्कृत उच्चार करून शुद्ध बोलणे याकडेही फारसे लक्ष न पुरवले गेल्याने वाणीकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे भाषा समृद्ध व्हावी असेही वाटेनासे झाले. कार्यालयीन कामकाज, वैद्यकीय व यांत्रिक क्षेत्रातील कामकाज संपूर्ण मराठी भाषेत नसल्याने इंग्रजीचा आधार घ्यावा लागत आहे. 

समाज घडविण्यात वृत्तपत्रांचा मोलाचा वाटा; पण स्थानिक प्रादेशिक बातम्या सोडल्यास इतर मुख्य बातम्या वृत्तपत्रांना इंग्रजी वा हिंदीतून पुरवल्या जातात. त्या बातम्यांचं भाषांतर करताना शब्दांची छटा व तिच्या लकबीचा सुंदर मिलाफ साधावा लागतो. तिथे बातमीदारांची मराठीवर पकड नसली, तर चुका होत असल्याचे आढळते.

शिक्षण मातृभाषेतून असेल तर मूलभूत संकल्पना, विषय यांचं सुस्पष्ट, सुलभ आकलन होतं. पण आज मातृभाषेकडे शिक्षकांसकट सर्वांनी पाठ फिरवलीय आणि पोटार्थी म्हणून निवडलेल्या इंग्रजी भाषेचा ‘साहित्य’ म्हणून आवाकाच माहीत नाही. म्हणजे एकीकडे केशवसुतांची तुतारी अडगळीत, तर दुसरीकडे वर्डस्वर्थची ‘एक्सकर्शन’, ‘डॅफोडील्स’ कोमेजलेली! असं शोचनीय चित्र आज शाळा-महाविद्यालयांचं आहे. इंग्रजी या एका विषयाला नको तेवढे महत्त्व दिल्यामुळे मुलांची सारी शक्ती केवळ ही भाषा आत्मसात करण्यात खर्च होते. बाकीचे विषय दुर्लक्षित झाल्यामुळे त्या विषयांचे नुकसान होते. लोकमान्य टिळकांनी एकदा म्हटले होते, ‘मला जर माझे शिक्षण माझ्या भाषेतून मिळाले असते, तर ५२ वर्षांत मी जे इंग्रजीतून शिकलो, ते सारे २५ वर्षांत शिकता आले असते.’ ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध कन्नड साहित्यिक डॉ. आनंद मूर्ती म्हणतात, ‘इंग्रजी माध्यमाच्या शाळा मुलांची सर्जनशीलता मारून टाकतात.’

दुर्दैवाने, इंग्रज गेले तरी त्यांच्या संस्कारांचा ठसा लुप्त झालेला नाही. मुलांचे Happy Birthday इंग्रजी महिन्यात साजरे केले जातात. त्यामुळे मुलांना मराठी महिने, ऋतू, निसर्गातील ऋतुबदल हे सांगता वा लिहिता येत नाही, हे आपल्या मराठी भाषकांचे दुर्दैवच!

वास्तविक स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे उलटून गेली तरी इंगजीचा वरचष्मा कमी झालेला नाही. भारतात महाराष्ट्रीय मुले मागे का? तर त्यांना इंग्रजी चांगले येत नाही. या वैचारिक पगड्यामुळे पालक पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणे पसंत करतात. 

‘बोआ’ या अंदमानमधील महिलेचा २०१०मध्ये अंत झाला आणि ‘जेरू’ भाषा बोलणारी शेवटची ही एकमेव महिला गेल्यानंतर त्या भाषेचाही शेवट झाला. म्हणजे मराठी भाषा खुरडत जगत राहिली, तर ‘जेरू’ भाषेसारखी स्थिती काही शेकडो वर्षांनी मराठीची होऊ शकेल, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. 

इंग्रज मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांच्या कानाकोपऱ्यात जाऊन वर्चस्व गाजवता झाला म्हणून इंग्लिश ही जगाची संपर्काची भाषा झाली. आपणही अशी सर्व क्षेत्रे काबीज केली तर शेकडो वर्षांनी का होईना मराठीसुद्धा जगाची ज्ञान-विज्ञानाची भाषा होऊ शकते. 

मराठीला टिकण्याचं हे आव्हान पेलण्यासाठी ती भाषा बोलणारी माणसं जीवनाच्या सर्व क्षेत्रात कर्तबगारी करणारी असली पाहिजेत. अमेरिकेतल्या ‘सिलिकॉन व्हॅली’कडे बघा. तिची सेकंड लँग्वेज मराठी आहे. हे स्थान प्राप्त करून देणारे मराठी भाषकच आहेत. 

मराठी टिकून राहण्यासाठी आर्थिक, जागतिक, व्यापारी, शैक्षणिक स्तराबरोबरच कौटुंबिक स्तरावर प्रयत्न व्हायला हवेत. शिक्षण इंग्रजीत असलं, तरी घरी आपलीच भाषा बोलण्याची जागरूकता पालकांनी दाखवायला हवी. दोन भाषांमुळे मुले गोंधळून जातील अशी भीती पालक व्यक्त करतात ती चुकीची आहे. उलट मुलांचा मेंदू एकापेक्षा जास्त भाषा शिकवण्यासाठी तयार असतो. 

‘मराठी भाषासंस्कृती धोक्यात आहे का?’.... तर अजिबात नाही. ती कचकड्याची संस्कृती आहे का? तिच्या अस्तित्वाच्या समस्या आहेतच पण त्यावर उपाययोजना नाहीत असं नाही ना! विविध प्रकारे विविध पातळ्यांवर सहकार्य केले, तर मराठीला बळकटी निश्चित येईल. त्यासाठी खेड्यापाड्यांपर्यंत साहित्य-संमेलने भरवणे, भाषा-समृद्धी मंडळांना सर्वतोपरी वैयक्तिक व सरकारी पातळीवर सहकार्य, शैक्षणिक क्षेत्रात भाषांचे योग्य व परिपूर्ण ज्ञान असलेले विचारवंत व अनुभवी शिक्षक नेमणे, भाषेची गोडी वाढवण्यासाठी शाळांतून कथाकथन, विचार-प्रकटीकरण, अनुभवकथन-लेखन, विविध व्याख्याने असे उपक्रम राबवून मुलांना बहुश्रुत करणे, अन्य भाषेतील दर्जेदार साहित्य आपल्या भाषेत अनुवादित होण्यासाठी अन्य भाषेतील साहित्य भगिनीभावाने व उदार भावाने स्वीकारणे, साहित्य-कला -क्रीडा-अवकाश-शास्त्र अशा सर्व क्षेत्रांत मराठी भाषक -प्रतिभावंत निर्माण होण्यास प्रोत्साहित करणे आदी प्रयत्न करणे आवश्यक आहे. 

भाषा जास्त काळ टिकवली गेली, तर तिची संस्काराची ताकद वाढेल. शिक्षकांनी केवळ शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धन हवेच; त्याशिवाय चरितार्थ चालणार नाही; पण केवळ धनाच्याच मागे लागून आत्मिक समाधान मिळणार नाही. शिकलेले सुसंस्कृत, मराठी, भाषाभिमानी विद्यार्थी पुढे आले, तर ते धन कुबेरालाही लाजवेल असे आहे. प्रेमाने भाषेचे संवर्धन करू या, भाषेची अस्मिता असण्यापेक्षा तिच्याविषयी प्रेम, आत्मीयता असणं महत्त्वाचं आहे. कारण अस्मिता ही शेवट दुरभिमानाकडे जाते. 

समारोपाकडे जाताना एवढंच म्हणेन -

टाळण्या मरण, शिका मातृभाषेत ।।
व्यवहार ते सर्व, करा मातृभाषेत ।।

हे लक्षात घेतल्यास, मराठीचे वैभव दिमाखाने गगनभरारी मारेल, यात शंकाच नाही.
- पूजा संजय कात्रे
ई-मेल : poojaskatre@gmail.com

(लेखिका कुवारबाव (रत्नागिरी) येथील श्रीमती राधाबाई गोपाळ जागुष्टे हायस्कूलमध्ये सहायक शिक्षिका म्हणून कार्यरत असून, मराठी विषयाचे अध्यापन करतात.) 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZZLCM
Similar Posts
तुम्ही मराठीतील ‘हे’ शब्द लिहिताना चुकता का? मराठी भाषा बोलताना, लिहिताना रोजच्या वापरातल्या अनेक शब्दांचे लेखन अनेकांकडून अनेकदा अयोग्य पद्धतीने केले जात असल्याचे दिसते. अनेक मराठी घरांमध्ये एकही मराठी शब्दकोश नसतो. असला तरी त्यात शब्दांचे योग्य-अयोग्य लेखन पडताळून न पाहता केवळ अनुकरण करण्याची सवय वर्षानुवर्षे चालत आली आहे. परंतु एखादी गोष्ट वर्षानुवर्षे चुकीची केली म्हणून ती बरोबर ठरत नसते
कविवर्य कुसुमाग्रजांची ‘विशाखा’ ‘जीवनलहरी’ आणि ‘जाईचा कुंज’ यांनंतरचा ‘विशाखा’ हा कुसुमाग्रजांचा तिसरा काव्यसंग्रह. औचित्य, संयम, विलक्षण जीवन, निसर्ग, राष्ट्र यावरील प्रेम यांतून कुसुमाग्रजांच्या कवितेचा प्रवाह खळखळत, वेगाने वाहत राहतो, याचा प्रत्यय ‘विशाखा’तील कवितांमधून पुन:पुन्हा येतो. आज, २७ फेब्रुवारीला कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो
भाषेचे जगणे-मरणे... एका ज्येष्ठ पत्रकार मित्राची ‘अचूक मराठी’वरील एक नोंद वाचली आणि त्यांची तळमळ अस्वस्थ करून गेली. मराठीच्या चिंधड्या उडविण्याची स्पर्धा स्वजनांकडूनच सुरू असून माध्यमे - विशेषत: चित्रवाणी माध्यमे - त्या स्पर्धेत हिरीरीने उतरलेली दिसतात. त्या नोंदीमुळे मग एक स्वगत-चिंतन-होऊन गेले. सहज वाटलं, हा तर अपरिहार्य बदलाचा प्रभाव आहे
बोलू ‘बोली’चे बोल! मराठी राजभाषा दिन (२७ फेब्रुवारी) आणि आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्ष (२०१९) या निमित्तानं ‘बाइट्स ऑफ इंडिया’चा विशेष उपक्रम -‘बोलू ‘बोली’चे बोल!’ मराठीच्या विविध बोलीभाषांचा आस्वाद आपल्याला या उपक्रमातल्या व्हिडिओंमधून घेता येईल. मराठीच्या विविध बोलीभाषांमध्ये सुरू असलेल्या उपक्रमांबद्दल सांगणारा हा लेख

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language